संजय शहाणे इंदिरानगरभारतनगरलगतच्या घरकुल योजनेतील १५७ घरांच्या लाभार्थी ऐवजी अनधिकृतपणे घराचे कुलूप तोडून काही रहिवांशांनी ताबा घेतला आहे. त्यामुळे लाभार्थींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासनाने अनधिकृतपणे कुलूप तोडून घरकुल योजनेच्या घराचा ताबा घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत योजनेत बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या झोपड्यांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे जमाही करण्यात आली होती. त्याप्रमाणे भारतनगरलगत ६२0 घरकुलांची योजना बांधण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्या टप्प्यात तीनशे व दुसऱ्या टप्प्यात १६३ घरकुले सोडत पद्धतीने क्रमांक काढून घरकुलाचे वाटपही करण्यात आले होते. तसेच १५७ घरकुलांचे वाटपही काही दिवसांतच करण्यात येणार होते. परंतु मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई नाका नासर्डी पूल ते शिवाजीवाडी नासर्डी नदी पुलाच्या दरम्यान नदीकाठच्या सुमारे दोनशे घरांत पावसाचे आणि नदीचे पाणी शिरले होते. त्यामुळे संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. भारतनगर लगतच्या १५७ घरकुलांचे कुलूप तोडून त्यामध्ये काही भाडेकरूंनी अनधिकृत प्रवेश केला आहे. खरे लाभार्थी अद्यापही मनपाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीसाठी केलेल्या जागी राहत आहे. तसेच १५७ घरकुले अनधिकृत प्रवेश करणाऱ्या यापैकी काही जणांनी घरकुल योजनेत दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. जवाहरलाल नेहरू पुनर्उथ्यान योजनेतून मनपाने बांधलेल्या घरकुलाचे कुलूप तोडून अनधिकृपणे प्रवेश करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घरकुल योजनेचा अनधिकृत ताबा
By admin | Published: August 09, 2016 12:45 AM