नाशिक : महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सन २००९ नंतरची अनधिकृत आढळून आलेली २८४ धार्मिक स्थळे २७ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हटविण्याचे निर्देश न्यायालयाने देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. सदर अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची डेडलाइन दहा दिवसांवर येऊन ठेपली असताना महापालिका प्रशासन मात्र कारवाईबाबत मौन बाळगून आहे. दरम्यान, सदर कारवाईबाबत महापालिका व पोलीस आयुक्त यांच्या समितीच्या बैठकीलाही मुहूर्त लागत नसल्याने अल्पकालावधीत कारवाईचे आव्हान महापालिकेपुढे उभे ठाकले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत २०११ मध्ये महापालिकांना कारवाईचे आदेश काढले होते. मात्र, कारवाईला झालेल्या विलंबामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी २१ आॅक्टोबर २०१५ पासून दोन वर्षे इतका कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार, महापालिकेने शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात महापालिका हद्दीत सन २००९ पूर्वीची १०६४, तर सन २००९ नंतरची २८४ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली होती. त्यात सन २००९ नंतर उभी राहिलेली २८४ धार्मिक स्थळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीनुसार २७ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हटविण्याची कारवाई महापालिकेला करायची आहे.
अनधिकृत धार्मिक स्थळे; डेडलाइन दहा दिवसांवर
By admin | Published: October 18, 2016 2:54 AM