नाशिक : महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सन २००९ नंतरची अनधिकृत आढळून आलेली २८४ धार्मिक स्थळे २७ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हटविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. अवघ्या चार महिन्यांत करावयाच्या कारवाईबाबत प्रशासनात सध्या खल सुरू असून, पोलीस आयुक्तांकडे लवकरच अहवाल पाठविला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत २०११ मध्ये महापालिकांना कारवाईचे आदेश काढले होते. मात्र, कारवाईला झालेल्या विलंबामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी २१ आॅक्टोबर २०१५ पासून दोन वर्षे इतका कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार, महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात महापालिका हद्दीत सन २००९ पूर्वीची १०६४, तर सन २००९ नंतरची २८४ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली होती. त्यात सन २००९ नंतर उभी राहिलेली २८४ धार्मिक स्थळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीनुसार २७ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हटविण्याची कारवाई महापालिकेला करायची आहे. तर २९ सप्टेंबर २००९ पूर्वीच्या १०६४ अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत नियमितीकरण, स्थलांतरण अन्यथा निष्कासन या तीन पातळ्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यातील जी बांधकामे रस्त्यात अडथळा ठरणार नसतील आणि कागदोपत्री काही पुरावे असतील तर नियमित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी २७ एप्रिल २०१६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जी बांधकामे स्थलांतरित करणे शक्य आहे त्यासाठी २७ जुलै २०१६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यातील नियमितीकरण आणि स्थलांतरितही होऊ न शकणारी बांधकामे मात्र २७ आॅक्टोबर २०१७ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत हटविली जाणार आहेत. दरम्यान, महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकती मागविल्या असता ६३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अतिक्रमण विभागाने अहवाल आयुक्तांकडे रवाना केला असून, लवकरच सदर अहवाल पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्या समितीपुढे तो सादर केला जाणार आहे. २८४ धार्मिक स्थळे कोणत्याही परिस्थितीत आॅक्टोबरपूर्वी हटविण्याची कार्यवाही मनपाला करावी लागणार आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने आणि मनपाकडून इतरही प्राप्त तक्रारींनुसार अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही सुरू असल्याने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांबाबत मनपा प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत धार्मिक स्थळे; महापालिकेपुढे पेच
By admin | Published: June 22, 2016 11:37 PM