पंचवटी : नाशिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविले. अतिक्रमण हटविताना महापालिकेने झोपडपट्टीधारकांच्या वस्तू जप्त करण्याची कारवाई केली आहे. महापालिकेने शुक्रवारी जवळपास ३५ अनधिकृत झोपड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. गेल्याच आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात साधुग्रामच्या जागेवरील असलेल्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई केली होती. जवळपास १०० हून अधिक झोपड्या हटविण्यात आल्यानंतर शेवटच्या टप्प्यातील झोपड्यांचे अतिक्रमण असताना झोपडपट्टीतील काही महिलांनी महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर महापालिकेच्या अधिकाºयांनी आडगाव पोलिसांना माहिती करून जादा पोलीस कुमक मागवून पोलीस बंदोबस्तात राहिलेल्या झोपड्या हटविण्याचे काम केले होते. या प्रकारानंतर झोपडपट्टीतील त्या महिलांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून मनपाच्या अधिकाºयांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यासाठी धाव घेतली खरी; मात्र कोणतीही तक्र ार दाखल न करताच तसेच माघारी फिरले होते. साधुग्रामच्या आरक्षित जागेवरील झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडाभराचा कालावधी लोटत नाही तोच त्या जागेवर पुन्हा अनधिकृतपणे झोपड्या तसेच पाल उभारून अतिक्रमण करून महापालिका प्रशासनासमोर आव्हान ठाकले होते. महापालिकेने अखेर शुक्रवारी तपोवनातील साधुग्रामच्या आरक्षित जागेवर थाटलेल्या अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण हटवून झोपडपट्टीधारकांचे साहित्यही जप्त करण्याची कारवाई केली आहे. संरक्षक भिंतीचा प्रस्ताव प्रलंबितमहापालिकेच्या ज्या जागेवर सातत्याने अतिक्रमण होते ती प्रशासनाच्या ताब्यात आहे. मात्र त्याठिकाणी कुंपण केलेले नाही अथवा संरक्षक भिंतदेखील बांधलेली नाही. त्यामुळे या जागेवर झोपडपट्ट्या होत असतात. याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी अतिक्रमण विभागाने बांधकाम आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याने मनपाला वारंवार अतिक्रमणे हटवण्यासाठी जाऊन संघर्ष करावे लागत आहे.