जायखेडा : राज्यात आंतरजिल्हा प्रवासास बंदी असताना मुंबई येथून विनापरवाना येऊन वरचे टेंभे, ता. बागलाण येथे कोरोनाचा फैलाव केल्याप्रकरणी व त्यांना आश्रय दिल्याप्रकरणी एकूण सात जणांवर जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी मुंबई घाटकोपर येथील महिला बागलाण तालुक्यातील वरचे टेंभे येथे आली होती. येथे तिची तब्येत बिघडल्याने ती आपल्या मुलासोबत देवळा तालुक्यातील वासोळपाडा गावी गेली.येथे प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने नाशिक येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान या महिलेचा नाशिक येथे मृत्यूझाला. तपासणीसाठी पाठवलेला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. लागलीच या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात येऊन तपासण्या करण्यात आल्या होत्या.यात पन्नास वर्षीय महिला व दहावर्षीय बालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या सात जणांविरोधात जायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.