नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाने नियमबाह्य आणि अनधिकृत वापराबद्दल नोटिसा बजावल्यानंतर शहरातील १६६ मंगल कार्यालये आणि लॉन्सवर येत्या सोमवारपासून (दि.२१) हातोडा पडणार आहे. अधिक मासामुळे लग्नतिथी नसल्याने महापालिकेने कारवाईची तयारी केली असून, कारवाईपूर्वीच काही लॉन्सचालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे काढून घेण्यास सुुरुवात केली आहे.महापालिकेच्या नगररचना विभागाने स्थायी समितीने केलेल्या आदेशानुसार, चार महिन्यांपूर्वी शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स यांचे सर्वेक्षण केले असता सुमारे १६६ मंगल कार्यालये, लॉन्स हे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेने या संबंधितांना त्यानुसार नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेकडे असलेल्या नोंदीनुसार शहरातील केवळ पाचच लॉन्स व मंगल कार्यालये अधिकृत आहेत. उर्वरित लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये अनधिकृतपणे शेड उभारणी, पक्की बांधकामे करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या नोटिसा गेल्यानंतर काही लॉन्सचालकांनी शासनाच्या अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरणाच्या धोरणानुसार नगररचना विभागाकडे प्रस्तावही दाखल केलेले आहेत; परंतु त्यांची संख्या खूपच अल्प असल्याचे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत वापराबद्दल लॉन्स व मंगल कार्यालयांवर कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट केल्यानंतर लॉन्सचालकांनी नगररचना विभागाकडे येऊन बांधकामे नियमितीकरणाविषयी चाचपणी केली; परंतु नियमितीकरणासाठी कम्पाउंडिंग चार्जेस हे अवाजवी असल्याने अनेकांनी कारवाई सुरू होण्यापूर्वीच स्वत:हून बांधकामे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
अनधिकृत वापर : कारवाईसाठी महापालिकेने शोधला अधिक मासाचा मुहूर्त लॉन्सवर सोमवारपासून हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:52 AM
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाने नियमबाह्य आणि अनधिकृत वापराबद्दल नोटिसा बजावल्यानंतर शहरातील १६६ मंगल कार्यालये आणि लॉन्सवर येत्या सोमवारपासून (दि.२१) हातोडा पडणार आहे.
ठळक मुद्देअनधिकृत बांधकामे काढून घेण्यास सुुरुवात केलीशहरातील केवळ पाचच लॉन्स व मंगल कार्यालये अधिकृत