नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांची नजर असून, या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले होते, मात्र यासंदर्भातील नियमावली मागणाऱ्या इच्छुकांना अशाप्रकारची कोणतीच नियमावली नाही, केवळ आयुक्तांचे तोंडी आदेश आहे, असे सांगण्यात आल्याने संबंधितांना माघारी फिरावे लागले, परंतु पालिकेचे कनिष्ठ अधिकारीच याबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले.महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रचार सुरू केला आहे. अनेक इच्छुकांनी आणि नगरेसवकांनी व्हॉट््स अॅप ग्रुपच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. परंतु महापालिकेची निवडणूक घोषित झाल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोशल मीडियाच्या प्रचारावर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर असल्याचे सांगितले. तसेच सोशल मीडियावर प्रचारापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार काही इच्छुक उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीशी संंबंधित उपआयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, परवानगी कशी घ्यायची, अर्ज कोठे उपलब्ध आहे, व्हॉट््स अॅपवर प्रचार करण्यासाठी किती शुल्क भरावे लागेल, फेसबुकसाठी कसा अर्ज करायचा, अशी विचारणा करताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या यासंदर्भातील प्रतीची मागणी केली. त्यावेळी महापालिकेच्या उपआयुक्तांनी आपल्याकडे अशाप्रकारची कोणतीही प्रत उपलब्ध नसल्याचे सांगितले. इच्छुकांनी त्यावर आयुक्तांनीच पत्रकार परिषदेत याबाबत घोषित केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी आम्हाला केवळ तोंडी आदेश दिले आहे, लिखित पत्रक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित इच्छुक माघारी फिरले. परंतु यातून सोशल मीडियावर प्रचार कसा करायचा, याबाबत पालिकेचा निवडणूक कक्षच अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
पालिका सोशल मीडियातील प्रचाराबाबत अनभिज्ञ
By admin | Published: January 29, 2017 10:37 PM