सटाणा : बागलाण तालुक्यातील आरम नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दहिंदुले येथे शुक्रवारी (दि. १५) घडली आहे. गणेश रामचंद्र जगताप (वय ३२) व रोशन देवेंद्र बागुल (१८) अशी मृतांची नावे आहेत. दोघे चाफ्याचा पाडा (देवपूर) येथील रहिवासी असून नात्याने मामा-भाचे असल्याने चाफ्याचा पाडा शोकसागरात बुडाला आहे.याबाबत सटाणा पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केळझर धरणातून आरम नदीपात्रात शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे. आरम नदीला पाणी आल्याने चाफ्याचा पाडा येथील जगताप कुटुंबीय आरम नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुतल्यानंतर जगताप कुटुंबीय घरी निघालेले असताना गणेश जगताप व रोशन बागुल हे मामा-भाचे अंघोळीसाठी नदीजवळ थांबले. दहिंदुले येथील बंधाऱ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.रोशनने दिली नुकतीच बारावीची परीक्षापोलीस पाटील राजाराम साबळे यांनी याबाबत पोलिसांत खबर दिली असून, सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जे. ए. सोळंकी, जेडी लव्हारे, पोलीस नाईक एन. एस. भोये यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक युवकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढत सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणले. सायंकाळी उशिरा दोन्ही युवा मामा-भाच्यांवर शोकाकुल वातावरणात चाफ्याचा पाडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. मृत रोशन बागुल याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे.
आरम नदीपात्रात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 12:30 AM