नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीतील शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदासुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कोणाच्याही सुभेदारीला थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी निर्भयपणे मांडाव्या त्यांचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.सर्व शासकीय कार्यालयांसह रुग्णालय, महाविद्यालय, शाळा, बाजारपेठेसह झोपडपट्टीचा परिसर सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत समाविष्ट आहे. या परिसरात फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याची कबुली देत गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रत्यक्षपणे पोलीस रस्त्यावर राहणार असल्याची ग्वाही सांगळे यांनी यावेळी दिली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी, मोबाइल, वाहनचोरीसह घरफोड्या व हाणामाऱ्यांच्या वाढत्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यासाठी आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी धोरणात्मक आराखडा आखला असून, त्यांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे पोलिसिंग केले जाणार आहे. ठाणे अंमलदारापासून गुन्हे शोध पथकापर्यंतच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्याचे सांगळे म्हणाले. आगामी निवडणूक काळात मोठा ताण या पोलीस ठाण्यावर राहणार आहे. कारण सर्वच नेत्यांच्या महत्त्वाच्या सभा, दौरे, बैठका या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार असल्याने पोलीस बळाला त्यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी कमी होऊन नागरिकांना निर्भय वातावरण निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले.
सरकारवाड्यात सुभेदारी चालणार नाही : संजय सांगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 7:04 PM
शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदासुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कोणाच्याही सुभेदारीला थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी निर्भयपणे मांडाव्या त्यांचा निपटारा केला जाईल,
ठळक मुद्देआगामी निवडणूक काळात मोठा ताण