नाशिक : 'पावडरने दागिने चकाकून देतो' असे सांगत अज्ञात दोघा चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दोन सोनसाखळी घेऊन पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी हिराबाई बाळकृष्ण गीते (रा. लहवित) यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीने गीते यांच्याकडे आले व 'आम्ही कंपनीचे लोक आहोत, आमच्याजवळील पावडरने सोने चकाकून देतो, त्यातील घाण स्वच्छ करतो' असे सांगुन महिलांचा विश्वास संपाद करत दोन पोती त्यांच्याकडे गीते यांनी काढून दिल्या. 'पोत धुण्यासाठी पाणी लागेल' असे सांगून त्या भामट्यांनी पाण्याची मागणी केली. गीते या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या असता चोरट्यांनी सोन्याच्या दोन पोती घेऊन धूम ठोकली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
राहत्या घराजवळ महिलेची सोनसाखळी ओढली
सामनगावरोडवर राहणाऱ्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (दि.१३) संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रभागा तानाजी भोर (रा. सामनगावरोड) या शनिवारी (दि. १३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळच फेरफटका मारत होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीने त्यांच्याजवळ भरधाव आलेल्या दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने भोर यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.