मनमाड : दहेगाव शिवारातील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ज्ञान प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक आश्रमशाळेच्या इमारतीचे भाडे थकल्याने घरमालकाने टाळे ठोकले असून, विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.उषा बाबूराव पवार यांच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या या आश्रमशाळेच्या जागेचे २००१ सालापासून संस्थाचालकांनी भाडे दिलेले नाही. या शाळेत ७५ निवासी तर ८६ अनिवासी असे एकूण १६१ विद्यार्थी शिक्षण घेतात. वारंवार मागणी करूनही जागेचे भाडे अदा करण्यात न आल्याने जागामालकांनी या शाळेला कुलूप ठोकले आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना झाडाखाली उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. या आश्रमशाळेला शासनाकडून अुनदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. शौचालयाअभावी विद्यार्थ्यांना प्रातर्विधीसाठी उघड्यावर जावे लागते. ज्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची राहाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच खोल्यांमध्ये शिकवले जात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या आश्रमशाळेत मिळणाऱ्या असुविधांकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गोरगरीब व तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे या हेतूने शासनाकडून आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी तेथेच विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
शाळा झाडाखाली
By admin | Published: December 10, 2015 10:48 PM