मुसळगाव : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी प्रत्येक विभागात शिक्षणाची वारी हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात राज्यातील उपक्रमशील शिक्षक, शाळा सहभागी होऊन नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण करत असतात. यावर्षी कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ७ जिल्ह्याची शिक्षणाची वारी कोल्हापूर येथील तपोवन मैदानात संपन्न झाली. सिन्नर तालुक्यातील वावी केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोडी व शिवडा यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या उपक्रमांचे राज्यभरातील शिक्षण तज्ज्ञ, अधिकारी,शिक्षक यांनी कौतुक केले.सिन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने वावी केंद्राने नांदी लोकसहभागाची, समाज परीवर्तनाची, अन शाळा समृद्धीची हा उपक्रम सादर केला. सादरीकरण प्राथमिक शिक्षक संदिप लेंडे, अनिल उकले, उमेश खेडकर, युवराज राऊत, विठ्ठल कहांडळ यांनी केले. मार्गदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप पवार, केंद्रप्रमुख मनोहर तांबेकर, कुसुम निकुंभ, रजनी कापडणीस यांनी केले. दोडी शाळेने शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी स्पोकन इंग्लिश या उपक्रमाचा स्टॉल लावण्यात आला होता. स्टॉलचे सादरीकरण प्राथमिक शिक्षक संदिप पावडे, रामेश्वर किटकेवाड, दत्ता उगले, सोनाली आवारी यांनी केले. तसेच शिवडा शाळेच्या शिक्षिका ज्योती कदम यांनी संवाद किशोर वयाशी हा किशोरवयीन मुले-मुली यांच्यासाठी आकर्षक उपक्रम सादर केला. सिन्नर तालुक्याने उभारलेल्या तीनही स्टॉलला छान प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूरच्या शिक्षणवारीत सिन्नर विभागाचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:54 PM