नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि. १९ एप्रिल २०२१ पासून पुढे घेण्यात येणार असून, यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, कोरोनाचा संसर्ग पसरू नये तसेच अनेक ठिकाणी जाहीर करण्यात आलेली टाळेबंदी व निर्बंधामुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते. परंतु, विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षार्थींचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर, सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, परीक्षेसंदर्भातील अद्यावत माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहितीविषयी खात्री करून घेण्याचे आवाहनही डॉ. अजित पाठक यांनी केले. दरम्यान, प्रथम व द्वितीय वर्ष उन्हाळी - २०२० परीक्षांचे समचिकित्सा, आयुर्वेद, भौतिकोपचार विद्याशाखांचे निकाल प्रक्रियेचे कामकाज सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
इन्फो-
अंतिम वर्ष परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच
अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ मार्च २०२१ पासून सुरू असून, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षा नियमित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येत आहेत. तसेच लेखी परीक्षेनंतर तत्काळ विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी इंटर्नशिप करावी लागणार असून, या संबंधित विद्यार्थी कोविड-१९ रुग्ण सेवेकरिता उपलब्ध होणार आहे.
- अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक