नाशिक : पावसाळी गटारी योजनेचा उडालेल्या बोजवाऱ्यामुळे गंगापूररोड परिसरातील नागरिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सोमवारी (दि. १) आणि मंगळवारी (दि.२) झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूररोड येथील कमल रो-हौसिंग सोसायटी तसेच अशोका ‘अ’ आणि अशोका ‘ब’ इमारतीतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. घरातील महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजली असून, स्वयंपाक खोलीचीदेखील वाताहत झाली आहे.गंगापूररोड परिसरातील खतीब डेअरीच्या मागील बाजूस सांडपाणी वाहून जाणारा नाला असून, या नाल्यामधील चेंबर्स फुटल्याने सांडपाणी वाहून जाण्यात अडचण निर्माण होत आहे, परिणामी मुसळधार पावसात या नाल्याच्या काठी असणाऱ्या रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. महात्मानगर, कॉलेजरोड, गंगापूररोड या परिसरातील सांडपाणी भुयारी गटारीतून याच ठिकाणी येत असल्याने येथील रहिवाशांच्या समस्येत वाढ झाली आहे. या नाल्यातील चेंबर फुटले असून, चेंबरची आणि चेंबरला जोडणाऱ्या पाइपालाइनची दुरुस्ती करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत स्थानिक आमदार तथा नगसेवक देवयानी फरांदे यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदन दिल्यानंतर महापलिका प्रशासनातर्फे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परिसरात येऊन पाहणी करण्यात आली. ही पाहणी निव्वळ फार्सच ठरल्याचे पुरावरून स्पष्ट झाले आहे.या नाल्यामध्ये शहारातील विविध ठिकाणांवरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वळण देणे अपेक्षित होते, परंतु शासकीय अनास्थेमुळे हे पाणी येथेच सोडण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पावसाळ्याव्यतिरिक्तही येथील स्थानिक नागरिक दुर्गंधी, डासांच्या समस्येने त्रासलेले असतात. कमल रो-हौसिंग सोसायटीसह अशोका ‘अ’ आणि अशोका ‘ब’ या इमारतीतील तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात छातीपर्यंत पाणी साचले होते. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने येथील रहिवाशांना बचावासाठी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. इमारतीतील रहिवासी गंगाधर जोशी (८४) यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. या मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत खचली असून, ही भिंत प्रशासनाने बांधून देण्याची तसेच पुन्हा अशी आपत्ती रहिवाशांवर येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. घरातील पुरूषवर्ग कामानिमित्त घराबाहेर असल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी इमारतीजवळ असलेल्या मोरीला जेसीबीच्या सहाय्याने भगदाड पाडून पाण्याचा निचरा करण्यात आला.
भुयारी गटारीचे पाणी घरात
By admin | Published: August 05, 2016 1:19 AM