सिडको : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सीमा हिरे यांच्यासमवेत सिडको-सातपूर या मतदारसंघातील राणाप्रताप चौक तसेच परिसरातील धोकादायक वीजतारांची पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांना घरासमोरील धोकादायक वीजतारांबाबत तक्रारी करताच याबाबत सकारात्मक विचार करीत धोकादायक असलेल्या वीजतारा भूमिगत करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की गेली ३० ते ४० वर्षांपासून सिडको वसाहत ही विकसित होत आहे. पूर्वी सिडकोची घरे ही १० बाय १५ अशी होती, त्यानुसार सिडको वसाहतीमध्ये वीजतारांची मांडणी केली गेली होती. परंतु या ४० वर्षांत लोकांनी आपल्या पूर्वीच्या घरांचे वाढीव बांधकाम करून घरे सुधरविण्यात आली असल्याने आता पूर्वीची विद्युत वाहिनीची रचना ही कालबाह्य ठरली आहे. मतदारसंघातील विद्युत वाहिनी किती धोकादायक आहे हे त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, दत्तचौक, राणाप्रताप चौक, माउली लॉन्स, डीजीपीनगर, या संपूर्ण परिसराची पाहणी करताना आमदार सीमा हिरे यांनी ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून महावितरणच्या अधिकाºयांना लागलीच निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत सिडको-सातपूर मतदारसंघातील धोकादायक वीजतारा भूमिगत करण्यास प्राधान्य देण्याचे आदेश दिले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, आमदार जयवंत जाधव, नगरसेवक नीलेश ठाकरे, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, प्रतिभा पवार, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, महेश हिरे, शिवाजी बरके, शैलेश साळुंखे, माधवी मोराणकर, दिलीप देवांग, राकेश ढोमसे, गोविंद घुगे, महावितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर उपस्थित होते.सिडको भागातील घरांजवळून विद्युत तारा गेल्याने गेल्या काही वर्षांत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले असल्याचे निदर्शनात आणून दिले. गेल्या १५ दिवसांपूर्वीच असा अपघात झाल्याने तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्यामुळे विद्युत वाहिनी भूमिगत करणे हा मतदारसंघातील महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचे बावनकुळे यांच्या पाहणी दौºयानिमित्त निदर्शनास आणून दिले.
सिडको-सातपूर परिसरांतील वीजतारा होणार भूमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:29 AM