नाशिक : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी स्टेडियमच्या जागेचा वापर पार्किंगसाठी करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच क्रीडा संघटना, क्रीडाप्रेमी तसेच खेळाडूंनी या प्रकल्पाला पुन्हा विरोध करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात काही क्रीडा प्रशिक्षकांनी पालकमंत्र्यांना निवेदनदेखील दिले आहे. खेळासाठी शहरातील हे ऐकमेव मैदान असून, येथे अनेक खेळांचे प्रशिक्षण सुरू असताना मैदानाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या विकासासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच या जागेवर आता पार्किंगचा प्रस्ताव पुढे आल्याने यास क्रीडा संघटनांनी विरोध केला आहे. यापूर्वीदेखील पार्किंगला विरोध करण्यात आलेला आहे. या मैदानाची मालकी ही जिल्हा परिषदेकडे आहे. जिल्हा परिषदेने शहरातील खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा क्रीडा समिती या संस्थेचे मैदान ३० वर्षांच्या कराराने दिलेले आहे. या ठिकाणी व्हॉलीबॉल, खो खो, ज्युदो, कबड्डी, तलवारबाजी, नेमबाजी, ॲथलेटिक्स आदी विविध क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. खेळाडू येथे सरावही करतात. अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू येथे तयार झाले आहेत. -------------
क्रीडा गुणांचे काैशल्य विकसित करण्यासाठी ही जागा खेळाडूंसाठीच वापरण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. शहरात असलेल्या शाळा, शहरातील खेळाडूंसाठी हे मैदान सध्या उपयुक्त ठरत आहे. अनेक स्पर्धा येथे होतात. त्यामुळे या ठिकाणी नियोजित असलेला प्रकल्प रद्द करण्यात यावा.
अविनाश खैरनार, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक