देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या हद्दीत गेल्या दीड वर्षापासून संथगतीने सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामुळे वाहनधारक व उडणाऱ्या धुळीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.केंद्र शासनाच्या विशेष निधीतून देवळाली कॅम्पमध्ये १६० कोटींच्या भुयारी गटारी योजनेचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. देवळाली कॅम्पमधील छोट्या रस्त्यामध्ये भूमिगत गटारीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र भूमिगत गटारीचे पाईप टाकल्यानंतर माती टाकून बुजविण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. विशेष करून दुचाकीचालकांना ओबडधोबड रस्त्यामुळे वाहनाचे नुकसान होऊन सोबत शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.नाशिकरोड-देवळाली कॅम्प, भगूर यांना जोडणारा एकमेव लॅमरोड हा रस्ता असून, गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. दस्तगीरबाबा ते संसरी नाका येथे लॅमरोडवर भूमिगत गटारीचे काम पूर्ण करून बॅरिकेड्स व मातीने भरलेल्या गोण्या ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे वाहतुकीला त्रास होत असून छोटे-मोठे अपघात घडत आहे. भूमिगत गटारीसाठी खोदाई केलेल्या लॅमरोडचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास वाहनधारकांना मोठा त्रास सहन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूमिगत गटारीकरिता केलेली खोदाई माती टाकून बुजविण्यात आल्याने पावसाळ्यात चिखल होऊन वाहने घसरून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
भूमिगत गटारीचे काम संथगतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:32 AM