पंचवटी : नाशिक शहरात कोरोनाबधितांची दैनंदिन वाढणारी संख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने पंचवटीतील मेरी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी दिवसभरात ३४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात १९५ अँटिजेन तर १४७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण वाढल्याने लोकप्रतिनिधींनी मनपाकडे हे कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, नाशिक जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मेरी पंजाबराव देशमुख वसतिगृहात कोरोना केअर सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार ॲड. राहुल ढिकले, भाजप गटनेते जगदीश पाटील, नगरसेवक प्रियंका माने यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर विभागीय अधिकारी विवेक धांडे, डॉ. विजय देवकर, सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख आदींनी जागेची पाहणी करत आठवडाभरात मेरी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही केली. ही जागा ताब्यात घेत इमारतीत कोरोना रुग्णांना ठेवण्याची सोय केली आहे. अँटिजेन चाचणीत ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर आरटीपीसीआर अहवाल दोन दिवसांनी प्राप्त होईल. कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेत गोळ्या, औषधे देण्यात आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्य संख्या जाणून घेत समाजकल्याण येथे आयसोलेशन केंद्रात किंवा घरी जागा असेल तर गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिल्याचे डॉ. देवेंद्र धिवरे यांनी सांगितले.
इन्फो====
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी मनपा प्रशासनाने मेरी कोविड केअर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. केंद्रामध्ये आरटीपीसीआर, अँटिजेन चाचण्या होणार आहेत. कोविड केंद्रात १८० बेडची सोय केली असून, सर्व डॉक्टर, वार्ड बॉय, लॅब टेक्नीशियन आणि अन्य कर्मचारी यांची पूर्तता करण्यात येऊन बुधवारी हे कोविड केअर केंद्र सुरू केले आहे.
- विवेक धांडे, विभागीय अधिकारी, पंचवटी