नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये लिलावासाठी होणारी गर्दी लक्षात घेता बाजार समित्यांनी त्या पाश्व'भूमीवर नियोजन केले आहे. काही बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने ॲटीजन तपासणीसह नोंदणीकृत वाहनांनाच प्रवेश देण्याचे नियोजित आहे.उमराणेत पाचशे वाहनांना प्रवेशउमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवार (दि.२४) पासुन पूर्ववत सुरु करण्यात येणार आहेत. मात्र कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज पाचशे वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे. सोमवारी बाजार समिती आवारात मोठ्या प्रमाणावर कांदा लिलावासाठी येऊन गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पाश्व'भूमीवर हे नियोजन केले आहे.वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यात जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाजही बंद करण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांची कांदा माल विक्रीसाठी अडचण होऊ नये यासाठी मागील आठवड्यात व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर भाव भरुन देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांनी या निर्णयास प्रतिसाद न देता पूर्ववत लिलाव सुरु करण्याची मागणी केली होती. शिवाय गेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊन नंतर कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार कोरोनाविषयीचे सर्व नियम व अटी पाळून जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने येथील बाजार समितीचेही कामकाज सोमवारपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सौ.सोनाली देवरे यांनी दिली आहे. येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करण्यासाठी दररोज बाजार समितीच्या मोबाईल क्रमांकावर प्रथम नोंदणी केलेल्या पाचशे वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहीती बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहायक सचिव तुषार गायकवाड यांनी दिली आहे.
उद्यापासून कांदा लिलाव पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:03 PM