नाशिक : जिल्ह्यात फेब्रुवारीच्या प्रारंभापासून पुन्हा कोरोनाचे थैमान सुरू झाल्याने या आजाराच्या धास्तीमुळे ग्रामीण भाग, तसेच आदिवासी पाड्यावरील अनेक नागरिकांनी त्यांच्या रोग, आजारासाठी हॉस्पिटलमध्ये जाणे टाळले. या काळात अन्य गंभीर रुग्णांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यास प्रथम कोविड टेस्ट करण्याची सक्ती करण्यात आल्याने एकूणच सर्वच शासकीय रुग्णालयांमधील ओपीडी मोठ्या प्रमाणात घटली होती. ती आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असली तरी नेहमीच्या तुलनेत अद्यापही गर्दी कमीच आहे, तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये बहुतांश शस्त्रक्रियादेखील पूर्ववत होऊ लागल्या आहेत. केवळ त्यापूर्वी संबंधित रुग्णांची कोरोना चाचणी करून घेतली जात आहे.
कोरोनाकाळात अनेक नागरिकांचे आजार गत चार महिन्यांच्या कालावधीत बळावले आहेत, तसेच काही रुग्णांनी टाळलेल्या शस्त्रक्रिया त्यांच्या जिवावर बेतणाऱ्या ठरल्याचेदेखील काही उदाहरणांतून निष्पन्न झाले आहे. शहर आणि जिल्ह्यात कॅन्सर, टीबी, किडनी, हार्ट पेशंटचे प्रमाण दशकभरापासून खूप मोठे आहे. त्यातील प्रत्येक जण आपापल्या परीने डॉक्टरी उपचार, थेरपी, आवश्यकतेनुसार ऑपरेशन्स असे सर्व प्रकारचे उपचार घेत आले होते. मात्र, दिवाळीनंतर कमी झालेल्या कोरोनामुळे पुन्हा नियमित उपचारांना प्रारंभ करण्यात आला होता; परंतु फेब्रुवारीच्या प्रारंभापासून कोरोनामुळे अनेक व्याधीग्रस्त नागरिकांनी त्यांच्या नियमित चाचण्या आणि उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणेदेखील टाळले होते. मात्र, जूनपासून कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ओपीडी पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे, तर शस्त्रक्रिया विभागदेखील कमी-अधिक प्रमाणात सक्रिय झाले आहेत.
इन्फो
कोरोनाची धास्ती ठरली जीवघेणी
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेथील अन्य कुणा नागरिकाकडून कोरोनाची बाधा होईल, अशी धास्ती बहुतांश नागरिकांना वाटत होती. किंबहुना अन्य कुणाशी संपर्क आला नाही तरी हॉस्पिटलमधील कुणी कर्मचारी बाधित असण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे या काळात घरीच थांबलेल्या अनेक नागरिकांचे रोग बळावले असल्याने त्यांना विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागले. काहींना तर या अन्य आजारांनी उचल खाल्ल्याने जिवालादेखील मुकावे लागले.
इन्फो
विशिष्ट आजारांच्या तीव्रतेत वाढ
ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लाट काहीशी कमी झाल्यानंतर अनेक नागरिकांनी नोव्हेंबरच्या प्रारंभापासून त्यांच्या नियमित डॉक्टर, रुग्णालयांमध्ये जाण्यास प्रारंभ केल्यानंतर त्यांच्या व्याधीची तीव्रता घटली. त्यानंतर फेब्रुवारीपासून थेट मे अखेरपर्यंत कोरोनाचा कहर जास्त असल्याने अनेकांनी या तीन महिन्यांत रुग्णालयांमध्ये जाणेच टाळले. प्रामुख्याने कॅन्सर, हार्ट, किडनी, स्कीनचे आजार, पोटाचे विकार या रुग्णांचे प्रमाण सर्वांत मोठे असल्याचे आढळून आले आहे.
----------------------------------------------
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मुख्यत्वे ग्रामीण, आदिवासी आणि मनपा क्षेत्रातील नागरिक उपचारांसाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णांना वेळेत सुयोग्य उपचार देण्याला जिल्हा रुग्णालयाकडून प्राधान्य देण्यात येते. याठिकाणी दाखल होणारे रुग्ण हे येथे आपल्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम उपचार मिळतील, या विश्वासाने दाखल होतात. जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्य चिकित्सक, फिजिशियन, त्वचारोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सोनोग्राफी, आयुष विभाग यांचा समावेश आहे.
इन्फो
शासकीय रुग्णालयांमधील ७७ पदे रिक्त
जिल्ह्यात असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, नगर परिषद रुग्णालये, पोलीस अकॅडमी, मध्यवर्ती कारागृह, पोलीस दवाखाना, अशा एकूण ३७ रुग्णालयांसाठी डॉक्टरांची ३०३ पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे एक चतुर्थांश पदे अर्थात तब्बल ७७ पदे रिक्त आहेत. त्यात वर्ग १ ची अर्थात विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची ५४ पदे रिक्त आहेत, तर वर्ग २ च्या २३ डाॅक्टरांची पदे रिक्त आहेत.
-----------------