नाशिकरोड : देवळालीगाव येथील मनपाने महाडा स्कीम योजनेमध्ये बांधलेल्या गांधीधाम इमारतीचे विद्युत बिल थकल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने रहिवाशांची झालेली गैरसोय पाहता काही प्रमाणात वीज बील भरून मनसेच्या पुढाकाराने वीज कंपनीने पुरवठा पूर्ववत सुरू केला आहे.
देवळालीगाव येथील मनपाने म्हाडाच्या योजनेमध्ये गांधीधाम इमारत बांधली आहे. ८० सदनिका असलेल्या या इमारतीचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला. यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय झाली होती. स्थानिक रहिवाशांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याबाबत मनसेचे प्रकाश बंटी कोरडे यांना सदर बाब सांगितली.
कोरडे यांनी स्थानिक नागरिकांना तसेच मनसेचे उमेश भोई, शशिकांत चौधरी, नितीन धानापुणे, विशाल हाडा यांना सोबत घेऊन दत्तमंदिररोड येथील महावितरणच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
रहिवाशांची गरीब परिस्थिती व विद्युत पुरवठा खंडित केल्याने होत असलेली गैरसोय निदर्शनास आणून दिल्याने झटकरे यांनी थकीत वीज बिलाची काही रक्कम भरावीच लागेल असे स्पष्ट केल्यानंतर रहिवाशांनी देखील होकार देत थकीत बिलाची काही रक्कम भरल्यानंतर तात्काळ खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.