माळवाडी : राज्य शासनाने २०१० नंतर राज्यात शिक्षक भरती केलेली नाही; पण त्या उलट आश्वासनांचे गाजर दाखवत सीईटी पात्र असतानाही डी.एड. अभ्यासक्र म पूर्ण करून घेऊन टीईटी अनिवार्य केली आणि आता अभियोग्यता चाचणी घेऊन शिक्षक भरती करू, असे आश्वासन दिले. पण या सर्व परीक्षा घेऊनही आठ वर्षात एकदाही शिक्षक भरती केली नाही. या निषेधार्थ बेरोजगार शिक्षक सोशल मीडियावर आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.शासनाच्या विरोधात आमरण उपोषणाचीही तयारी करीत आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून २४ हजार रिक्त जागा अशी बातमी मिळताच सोशल मीडियावर बेरोजगार शिक्षकांनी हॅशटॅग शिक्षकभरती नावाने आपल्या मागण्या व्यक्त करीत आहेत. याच बरोबर शिक्षकभरतीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करून बेरोजगार शिक्षकांना पाठिंबा दिला आहे.बेरोजगार शिक्षकाने ट्विट करीत म्हटले की, गेल्या आठ वर्षांपासून शासनाकडून डी.एड. व बी.एड.धारकांवर आश्वासनांची खैरात केली जात आहे.यासह सुप्रिया सुळे यांनी डी.एड. बेरोजगारांच्या मागण्या समजून घेत ट्विट केले की, ‘चार वेळा घोषणा झाल्या, हा बेरोजगार तरुणांच्या भावनांशी खेळ आहे; आता सहा महिन्यांच्या आत भरती करण्याची नवी घोषणा झालीय, घोषणाबाजी बंद करून तातडीने शिक्षकभरती करावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र लिहीत आहे’, असे ट्विरवरून कळविले. तसेच विखे पाटील यांनी अभियोग्यता चाचणी झालेली असताना २४ हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशाला हवा, असा थेट प्रश्न ट्विटरवर विचारला आहे.
‘आयुष्य डी.एड.मुळे वाया जातंय, असे कळूनही शासनाला याचे गांभीर्य नाही’.- अक्षय शेवाळे,बेरोजगार शिक्षक