मालेगाव : राज्यात कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध लावण्यात आल्याने सारे जनजीवन ठप्प झाले आहे. त्याचा फटका सामान्य कामगारांना बसत असून, शहरातील यंत्रमागदेखील गेल्या महिना भरापासून बंद असल्याने लाखो यंत्रमाग कामगारांची उपासमार होत आहे.
शहरात सुमारे एक ते दीड लाख कामगार काम करतात. यंत्रमागावर त्यांना दर आठवड्याला मजुरी मिळते. मात्र कडक निर्बंधांमुळे शहरातील यंत्रमागांचा खडखडाट बंद झाला असून, लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांना भाजीपाला विकणे, रसवंती चालवणे अशी इतर कामे शोधावी लागत आहेत. झोपडपट्ट्यामध्ये आधीच दारिद्र्यात खितपत पडलेल्या यंत्रमाग मजुरांचे हाल होत असल्याने राज्य शासनाने त्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकून आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. निर्बंधांमुळे स्पिनिंग मिल्स बंद आहेत. त्यामुळे प्रकिया करण्यासाठी देशभरात पाली, बालोतरा अहमदाबाद , सुरत येथे माल विकला जातो. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक येथेही माल जातो, मात्र बंदमुळे तेथे माल पाठविता आलेला नाही. रिटेल मार्केटही बंद असल्याने माल घ्यायला कुणी तयार नाही. काही यंत्रमाग धारकांनी ५० टक्के कामगारांना घेऊन यंत्रमाग सुरू करण्याचा प्रयत्न केला.
इन्फो
न घरका, ना घाटका....
सव्वा लाख यंत्रमाग कामगार बेकार झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. यंत्रमाग चालकांनी रमजान ईदनिमित्त कामगारांना बोनस दिला. काही प्रमाणात उचलदेखील दिली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. मात्र हातांना काम नसल्याने यंत्रमाग कामगारांची अवस्था ‘न घरका ना घाटका’ अशी झाली आहे. राज्य शासनाने रेशनिंगचे धान्य वाढवून यंत्रमाग मजुरांना मदत करावी. शासनाबरोबरच श्रीमंत नागरिकांनी त्यांना आर्थिक मदत करावी . अनेक कामगार कोरोनाने बळी पडले आहेत, तर परराज्यातील काही कामगार आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. बऱ्याच कामगारांना इच्छा असूनही आपल्या राज्यात जाता आलेले नाही
इन्फो
भांडवल आणायचे कुठून?
कोरोनाचे संकट कमी झाले नाही आणि शासनाने निर्बंध जारीच ठेवले तर हाताला काम नसल्याने हजारो यंत्रमाग कामगारांचे भूकबळी जाण्याची शक्यता आहे. कारण यंत्रमाग कामगारांवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र सर्वच कामगारांना इतर रोजगार मिळेल व सर्वच कामगार व्यवसाय करतील याची शक्यता नाही. घरात खायलाच नाही तर व्यवसायासाठी भांडवल कोठून आणणार आणि कर्ज काढून व्यवसाय सुरूही केला तरी निर्बंधांमुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे यंत्रमाग मजुरांपुढे रोजी रोटीचा प्रश्न उभा असून शासनाने यंत्रमाग कामगारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो- २१ मालेगाव यंत्रमाग
===Photopath===
210521\21nsk_8_21052021_13.jpg
===Caption===
फोटो- २१ मालेगाव यंत्रमाग