नाशिक: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता तोट्यातील फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना ड्युट्या मिळण्याची संधी कमी होणार आहे. पर्यायाने अनेकांच्या नोकरीवर देखील गंडांतर येण्याची शक्यता असल्याने चालक-वाहकांमध्ये असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे.
कोरेानाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि नोकरीचा देखील प्रश्न निर्माण झाला होता. राज्य सरकारने दोनदा आर्थिक तरतूद केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू झाली. त्यामुळे आर्थिक संकटात रुतलेली एस.टी.ची चाके काही प्रमाणात गतिमान झाली असली तरी संकट मात्र अजूनही टळलेले नाही. महामंडळाने आर्थिक नियोजनावर अधिक भर दिल्याने उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तोटा कमी करण्याचे देखील प्रयत्न महामंडळाने सुरू केले आहेत.
महामंडळाने सध्या सर्वच प्रकारच्या बससेवा सुरू केलेल्या आहेत. राज्यभर बस पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांची सोय झाली असली तरी कमी भारमानामुळे महामंडळाला अजूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. प्रत्येक डेपोला ३० ते ५० टक्के इतका तोटा सहन करावा लागत आहे. नाशिक विाभागाला देखील दररोज ३० टक्क्यांपेक्षा अधिकचा तोटा सहन करावा लागत आहे. जिल्हांतर्गत बस चालविल्या जात असताना प्रवासी मात्र मिळत नसल्याची तक्रार असल्याने अशा कमी फायद्याच्या फेऱ्या कमी करण्याबाबत महामंडळाने विचार सुरू केला आहे.
महामंडळाने कमी उत्पन्न देणाऱ्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गावर बस सुरू आहेत त्या मार्गाचे अवलोकन करून जेथून उत्पन्न मिळते त्याच फेऱ्या सुरू ठेवण्याची तयारी चालविली असल्याचे समजते. तसे झाले तर नाशिक विभागातील सुमारे ३० टक्के फेऱ्या बंद करण्याची वेळ येणार असून त्यामुळे चालक वाहकांच्या ड्युट्या देखील कमी होऊ शकतात. कपातीचे धोरण पुढेही सुरू राहिल्यास चालक-वाहकांच्या संधी देखील कमी हेाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.