नाशिक : एका ठरावीक तालुक्यात अथवा गटात निधी वाटप केल्याच्या मुद्द्यावरून मागील काळात झालेला वाद नव्याने झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा उपस्थित केल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाची धार तीव्र झाली असून, आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये याच कारणावरून जुंपण्याची चिन्हे आहेत.विशेष म्हणजे राष्ट्रवादीत असमान निधी वाटपावरून वाद विकोपाला जाण्याची चिन्हे असतानाच सहयोगी भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मात्र ‘थांबा व प्रतीक्षा करा’ धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे.दोन दिवसांपूर्वीच पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी याच मुद्द्यावरून पदाधिकारी व सर्वच पक्षाच्या गटनेत्यांसह प्रमुख सदस्यांची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादीच्याच काही सदस्यांनी आपल्या गटातील निधी अन्यत्र का वळविला, आमच्या गटावर अन्याय झाल्याची ओरड केल्यानंतर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी बांधकाम व लघुपाटबंधारे विभागाकडून एकूणच सेस निधी वाटपाच्या नियोजनाची माहिती घेतल्याचे कळते. त्यात लेखा विभागाने आधीच्या नियोजनानुसार प्रशासकीय मान्यता दिल्या असून, आता नेमका कोणता निधी कोठे खर्च होणार आहे? याची माहिती देणे शक्य नसल्याचे सांगितल्याचे कळते. मुळातच राष्ट्रवादीच्या काही सदस्यांमध्ये मागील पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी असतानाच या पदाधिकाऱ्यांना सोबत असणाऱ्या सदस्यांच्या गटात निधी जास्त का?असे विचारत याच मुद्द्यावर बैठक तापविल्याचे कळते. मात्र हा निधी राष्ट्रवादी सदस्याच्या गटात नव्हे, तर भाजपा सदस्याच्या गटात देण्यात आला असून, त्याबदल्यात आपल्या गटातील निधी कमी करण्याचे कारण काय? असा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीच्याच एका सदस्याने एका पदाधिकाऱ्याला जाब विचारल्याचे कळते. तिकडे उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी राष्ट्रवादीत अंतर्गंत संघर्षाची आणि नाराजीची धार वाढत असतानाच मागील कोेणत्याच विषयावर न बोलण्याचे धोरण स्वीकारल्याने एकूणच राष्ट्रवादीत सारेच आलबेल नसल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
असमान निधी वाटप : सेसच्या निधीचा वाद विकोपाला
By admin | Published: December 25, 2014 1:00 AM