------------
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार लॉकडाऊनच्या आधी एक दिवस संपूर्ण बंद पाळून जणू लॉकडाऊनची रंगीत तालीम करण्यात आली होती. त्या लॉकडाऊनच्या रंगीत तालमीस रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. केवळ पोलीस आणि त्यांची वाहने रस्त्यावरून फिरत असल्याचे चित्र सर्व नागरिकांनी अनुभवले. त्याचप्रमाणे, २२ मार्चला थाळी आणि घंटानाद करून नागरिकांनी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती आभार व्यक्त केल्याच्या घटनांची स्मृतीही नागरिकांच्या मनात आजही कायम आहेत.
------------
५ एप्रिलला रात्री ९ वाजता प्रत्येक नागरिकाने ९ मिनिटे दिवा बंद करून दरवाजावर मेणबत्ती, पणती, मोबाइलच्या बॅटरीचा उजेड करून कोरोनाविरोधात लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाल्याचे दाखवून द्यायचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार, कोरोनाला हरविण्यासाठी प्रकाशाचा प्रसार करून एकजूट दाखविण्याच्या उद्देशाने अनेक घरांमध्ये वीज बंद करून दिवे, मोबाइलची बॅटरी चमकवत निर्धार व्यक्त करण्यात आला.
------------
१६ सप्टेंबर हा दिवस गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच एकाच दिवशी २,०४८ इतकी रुग्णसंख्या वाढ दर्शविणारा दिवस कोरोनाच्या काळातील भीती अधिकच दाट करणारा ठरला होता, तर यंदाच्या वर्षी १९ मार्चला कोरोना बाधितांच्या आकड्याने तब्बल अडीच हजारांचा टप्पा ओलांडत २,५०८ हा आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे.
---------------
हा मजकूर कोरोना विशेष पानासाठी आहे.