नाशिकरोड : हळदीचा कार्यक्रम सुरू असताना इमारतीच्या गच्चीवरून पडलेली मुलगी पित्याच्या अंगावर कोसळल्याने झालेल्या अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री सामनगाव रोडवरील अश्विननगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सामनगाव रोड अश्विनी कॉलनी येथे मनपा घरकुल योजनेच्या पाच मजली इमारती आहेत. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास विजय गोदडे यांची पुतणी रोहिणी हिचा हळदीचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी गर्दी झाली होती. नातेवाईक हळदीच्या कार्यक्रमात रंगले होते. यावेळी मुलगी सुनंदा विजय गोदडे (वय १६) ही इमारतीच्या गच्चीवरून हळदीचा कार्यक्रम पाहत होती. याचवेळी तिचा तोल गेल्याने ती खाली कोसळली आणि गर्दीत उभे असलेले वडील विजय किसन गोदडे (वय ३८) यांच्या डोक्यावर पडली. या आघातामुळे ते बेशुद्ध पडले. जखमी विजय गोदडे व मुलगी सुनंदा यांना नातेवाइकांनी त्वरित बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी जखमी विजय गोदडे यांना तपासून मयत घोषित केले, तर जखमी सुनंदा हिला फ्रॅक्चर झाल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाताच्या या विचित्र घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.विजय गोदडे यांनी केला वाचविण्याचा प्रयत्नक्षणार्धात घडलेल्या या घटनेत पित्याने मुलीला वाचविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र सर्वकाही एका क्षणात घडले की विजय यांना वेळच मिळाला नाही. मुलीचा इमारतीवरून तोल गेल्यानंतर काहीशी धावपळ आणि आरडाओरड झाली. याच दरम्यान हळदीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या विजय यांना काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव झाली आणि मुलीला वाचविण्यासाठी ते सरसावले. परंतु पाचव्या मजल्यावरून अतिवेगात मुलगी थेट अंगावरच कोसळल्याने विजय गोदडे जखमी झाले आणि त्यांची शुद्ध हरपली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उशीर झाला होता.
सामनगाव रोड अश्विनी कॉलनी येथे विचित्र घटनेत पित्याचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:33 AM