--------
बांधकाम प्रकल्पावरून पडून मृत्यू
नाशिक : बांधकाम सुरू असताना खाली पडून एकाचा मृत्यू झाला. दिनेश भगवान पाटील (४७, रा. नाशिक रोड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दिनेश पाटील हे किरण चौरे यांच्या बांधकाम साइटवर काम करत असताना खाली पडले. त्यामुळे त्यांना प्रथम संकल्प हॉस्पिटल आणि पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
----------
टोळक्याची कुटुंबीयांना मारहाण
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून चौघांनी कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली. या प्रकरणी मनू संजय कटारे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नंदू भाऊसाहेब मधे, लक्ष्मण उर्फ लखन भाऊसाहेब मधे, शुभम रंगनाथ मधे, सनी उर्फ सोमनाथ रघुनाथ झांझर (रा.सर्व कोळीवाडा, गंगापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२७) रात्री आठच्या सुमारास कटारे घरी येत असताना, संशयितांनी त्यास आडवून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याची आई व बहीण सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली, तसेच कोयत्याने मारहाण केली.
-------
महिलेवर चाकू हल्ला
नाशिक : दुसऱ्याकडे पैसे का मागतेस, अशी विचारणा करत, एकाने महिलेवर चाकूने हल्ला करत जखमी केले. या प्रकरणी निकिता साहेबराव गरुड यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तक्षिल रमेश आहिरे (२५, रा.सावरकरनगर, सातपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अहिरे याने फिर्यादीस त्याच्या बलेनो कारमध्ये बसवून घेतले. यावेळी तू दुसऱ्याकडे पैसे का मागतेस, अशी विचारणा करत, अचानक चाकूने हल्ला केला. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भडीकर करत आहेत.
----------
कट्ट्यासह एक ताब्यात
नाशिक : बेकायदेशीरपणे देशी कट्टा बाळगणाऱ्या एकास भद्रकाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मोहम्मद अन्वर सैय्यद (२६, रा.प्रज्ञानगर, नानावली) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३२ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये संशयित बेकायदेशीररीत्या कट्टा जवळ बाळगताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यास अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.