नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दप्तरमुक्त एक दिवस असा उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभागाच्या वतीने आताशिक्षकांसाठी युनिफॉर्म सक्तीचा करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून ही सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली.
नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी नवनवीन प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. मुलांना आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी दर शनिवार दप्तरमुक्त असेल अशी घोषणा त्यांनी केली आणि त्यानुसार गेल्या शनिवारी हा प्रयोग पार पडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आता दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळात पालकांनी आपले मोबाइल बंद ठेवून मुलांशी संवाद साधावा आणि त्यांचा अभ्यास घ्यावा अशी संकल्पना आहे. त्यानुसार प्रयोग सुरू झाला आहे. मात्र आतापुढील आठवड्यानंतर जबाबदारी दिलेले शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शिक्षण विभागला सादर करणार आहेत.
दरम्यान आता या पुढील पाऊल म्हणजे सर्व शिक्षकांना लवकरच गणवेश देण्यात येणार आहे. महापालिकेच्या शाळेत एकूण ८०० शिक्षक असून त्यांच्यासाठी विशिष्ट गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेतील मुलांबरोबरच शिक्षिकांची समानता दिसणार असल्याचे बी. टी. पाटील यांनी सांगितले.