प्रस्ताव मंजूर : २५ लाख रुपयांची तरतूद
नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील खुल्या प्रवर्गातील सुमारे साडेआठ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महापालिकेने त्याबाबतची रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा केली आहे. महापालिकेने त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे.महापालिकेच्या शाळांमध्ये सर्वशिक्षा अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह मुलींना मोफत गणवेशाचे वाटप केले जाते. परंतु, शालेय विद्यार्थ्यांमध्ये भेदाभेदाची भावना निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेशाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या शिक्षण विभागाने तयार केला होता. परंतु, गेल्या वर्षभरापासून विविध कारणास्तव प्रस्तावाची फाईल या टेबलावरून त्या टेबलावर फिरत होती. महापालिकेने शाळांमधील ८३५८ विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये दराने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला होता. फाईल फिरत राहिल्याने मागील वर्षी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले नव्हते. आता पुन्हा एकदा फाईलचा प्रवास सुरूच राहिल्याचे पाहून नुकतेच नियुक्त झालेले अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, २५ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास अखेर मान्यता मिळाली असून, संबंधित रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.