नाशिक : ‘तुमच्या विरोधात आम्ही आंदोलन करू...’ असे सांगून एका वकिल महिलेने तिच्या साथीदारांसोबत केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवसास्थानी येऊन आरडाओरड करत गोंधळ घातला. यावेळी पवार यांच्या स्वीय सहायकांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरेरावी करत असभ्य भाषेचा वापर करून त्यांना धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित ॲड. अल्का शेळवके यांच्याविरूद्ध शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि.३) गंगापुररोडवरील आनंदनगर येथील पवार यांच्या निवासस्थानी नांदेड रूग्णालयातील घटनेप्रकरणी पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास याठिकाणी संशयित शेळवके या त्यांच्या एका महिला व दोन पुरूष साथीदारांसोबत आल्या. या सर्वांनी संगनमताने त्याठिकाणी गोंधळ घातला.
येथील कार्यालयातील कर्मचारी फिर्यादी अश्विनी धर्मराज कनोज (२७,रा.पांडवनगरी) यांच्याशी हुज्जत करत आरडाओरड सुरू केली. यावेळी अश्विनी यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. तरीदेखील त्यांनी आराडाओरड सुरूच ठेवल्याने पत्रकार परिषदेत अडथळा निर्माण झाला. याचवेळी पवार यांचे स्वीय सहायक व बंदोबस्तावरील पोलिस अंमलदार यांनी मध्यस्तीसाठी प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांच्याशी वाद घालत आंदोलनाची धमकी देत शासकिय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, संशयित महिला या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर सुरू असलेल्या एका आंदोलनाला मंत्री डॉ. भारती पवार यांनी भेट द्यावी, ही मागणी घेऊन त्यांच्या निवासस्थानी आल्या होत्या, असे बोलले जात आहे. ही मागणी मांडताना त्यांनी आरडाओरड करत गोंधळ निर्माण करून गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यासह अज्ञात साथीदारांविरूद्ध शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरिक्षक सोळुंके या करीत आहेत.