भगूर परिसरातील गरीब, अनाथ, बेसहारा, निराधार लोकांचे पोट भरेल इतके अन्न विविध अन्नदान संस्थांच्या वतीने एका फ्रीजमध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या कोणास अशी काही मदत अन्न स्वरुपात करायची असेल त्यांनी पुढे येऊन या फ्रीजमध्ये चांगले अन्न ठेवून मदत करावी, असा त्यामागचा हेतू असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष कैलास भोर यांनी दिली. त्यासाठी माणुसकीचा फ्रीज इंंदिरा गांधी चौक येथे ठेवण्यात आला आहे. संस्थेतर्फे भाजी, पोळी, पुरी, भाजी, भात, फळे ठेवण्यात येत आहे. यात गरजवंतांना पोटाला लागेल इतके अन्न घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बारा बलुतेदार अठरा पगड जाती संस्थेचे प्रमुख कैलास भोर, विशाल बलकवडे, प्रमोद आंबेकर, बिपीन तडवी, प्रसाद आडके, संदीप गोरे, बब्बू शेख, अविनाश दिवटे, रवींद्र काळे आदी उपस्थित होते.
कोट==
या उपक्रमामुळे गरिबांना कोणाच्या दारात भीक मागण्याची गरज पडणार नाही. संस्थेने कायमस्वरूपी हा उपक्रम राबवून गोरगरिबांचे आशीर्वाद घ्यावे
- स्थानिक गरजवंत
( फोटो ०२ भगुर) भगूरमध्ये भूक शमविण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करताना प्रेरणा बलकवडे, संस्थेचे पदाधिकारी.
वाहतुकीला अडथळा
नाशिकरोड : पाइपलाइन टाकण्यासाठी सुभाषरोड भागातील रस्ता खोदण्यात आला असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पवारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकातच रस्ता खोदून ठेवल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
नाशिकरोडला कारवाईची मागणी
नाशिकरोड : शहरात वाढत असलेला कोराेनाचा प्रसार थोपवण्यासाठी महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असली तरी नाशिकरोड भागातील देवी चौक, मीना बाजार परिसरात नागरिक सर्रास विना मास्क फिरताना दिसत आहे. यामुळे कोरोना पसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भाजीबाजारात दक्षता
नाशिकरोड : कोरोना पुन्हा डोके वर काढत असून, त्यापासून बचावासाठी नागरिकही सजग झाले आहेत. अनेक नागरिक मास्कचा तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करताना दिसत आहे. येथील उड्डाणपुलाखाली भरणाऱ्या भाजीबाजारातसुद्धा येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हातावर सॅनिटायझर दिले जात आहे.