बोलठाण : जातेगाव येथे एक वर्षापासून नादुरुस्त असलेले विजेचे ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केले जात नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याने शेतकऱ्यांना नवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर ट्रान्सफॉर्मर बंद असला तरी वीजबिल मात्र येत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या बंद ट्रान्सफॉर्मरवरच पाळणा बांधून अनोखे आंदोलन करीत वीज मंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगाव येथील नामदेव थोरात यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर सुमारे एक वर्षापासून नादुरुस्त आहे. त्याचा वीजपुरवठा जरी बंद असला तरी शेतकऱ्यांना विजेचे बिल मात्र भरावे लागत आहे. ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करुन बसवावा यासाठी शेतकऱ्यांतर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र वर्ष उलटले तरी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचा मुहूर्त महावितरणला अद्याप सापडलेला नाही.महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. ऐन रब्बी हंगामात सक्तीची वीज बिल वसुली सुरु करण्यात आली असून बिल न भरणाऱ्या परिसरातील ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे रब्बी पिके मोठ्या संकटात सापडली आहे.त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जातेगाव येथील विद्युत रोहित्राच्या जवळ पाळणा बांधला व त्यावर बसून आंदोलन करीत वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून रोहित्र मिळेपर्यंत हे अनोखे आंदोलन चालूच राहणार असल्याचे संतप्तशेतकऱ्यांनी सांगितले. प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, उपाध्यक्ष चंद्रभान झोेगडे, जनार्दन भागवत, प्रकाश चव्हाण, रविकांत भागवत, रमेश जाधव आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.