नाशिक : राष्टपुरुषांचे पुतळे किंवा शिल्प सर्वांनीच बघितलेले असतात, परंतु त्यापलीकडे जाऊन संत महात्मे, साहित्यिक इतकेच नव्हे नाशिकमधील कलांवतांच्या हुबेहूब साकारलेल्या शिल्पकृतींचे प्रदर्शन येथील हार्मनी आर्ट गॅलरीत मंगळवारी (दि.२९) सुरू झाले.ज्येष्ठशिल्पकार (कै.) नेताजी भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित या प्रदर्शनात भोईर यांचीही दोन अप्रतिम शिल्प ठेवण्यात आली आहेत.शहरातील मान्यवर शिल्पकार आणि हार्मनी यांच्या वतीने कॉलेजरोडवरील गॅलरीमध्ये भोईर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले असून, मंगळवारी (दि.२९) या प्रदर्शनाचे उद््घाटन ग्रंथप्रेमी विनायक रानडे यांच्या हस्ते व ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून बारा बलुतेदार महासंघाचे अरुण नेवासकर तसेच शिल्पकार सुरेश नेताजी भोईर, झारखंड येथील पर्यावरणप्रेमी श्रीराम डाल्टन उपस्थित होते. या प्रदर्शनात सर विश्वेश्वरय्या, संत जनार्दन स्वामी, अनिरुद्ध बापू, गणेश बाबा, शंकर महाराज यांच्याबरोबरच नेताजी भोईर, मंगेश पाडगावकर, नाशिकचे कलावंत सी. एल. कुलकर्णी तसेच नाशिकच्या कलाक्षेत्रातील मान्यवरांचे शिल्प प्रदर्शित करण्यात आले आहे. यतिन पंडित, श्रेयस गर्गे, नीलेश ढेरे, वरुण भोईर, सुरेश भोईर, शरद मैंद, प्रा. योगेश गटकळ, प्रा. भूषण कोंबळे, प्राचार्य सचिन जाधव, सागर शिरसाठ यांनी या कलाकृती साकारल्या आहेत.यावेळी प्रमुख अतिथींनी एका शिल्पकाराच्या श्रद्धांजलीपर अशाप्रकारचे प्रदर्शन भरविणे हे उचित तर आहेच, परंतु कला क्षेत्रातील दादा मानल्या जाणाऱ्या नेताजी भोईर यांना ही खरोखरीच श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले, तर आपल्या सभोवताली जे नाही हेच कलावंतांना हवे असते आणि मनातील निसर्ग चित्राच्या भावना ते कॅनव्हासवर अभिव्यक्त करताते असे सांगून भोवतालचे पर्यावरण नष्ट होत चालल्याची खंत श्रीराम डाल्टन यांनी व्यक्त केली. प्रा. बाळ नगरकर यांनी सूत्रसंचालन, तर राजा पाटेकर यांनी आभार मानले.
हुबेहूब शिल्प साकारत नेताजींना अनोखी श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:40 AM