नाशिक : मकर तारका समूहात मंगळवारी (दि.५) पहाटे पूर्व आकाशात तेजस्वी शनी व तांबूस मंगळ या दोन्ही ग्रहांची देखणी युती पाहायला मिळणार आहे. सोबतच काही अंतरावर तेजस्वी शुक्रही अनुभवता येणार असून, ही खगोलीय घटना उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी म्हटले आहे.
ज्योतिषतज्ज्ञ व पंचांगकर्त्यांच्या मते या कालावधीत काही स्फोटक घटना घडण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ५ एप्रिलच्या पहाटे पूर्व आकाशात तेजस्वी शनी आणि तांबूस मंगळ हे ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ दिसणार असून, मकर तारका समूहात त्यांची देखणी युती पाहायला मिळणार आहे. या दोघांमधील कोनीय अंतर ०.३ अंशांइतके कमी असेल. यांच्या सोबतच काही अंतरावर तेजस्वी शुक्रही पाहता येणार आहे.
पृथ्वीवरून बघताना कधी-कधी दोन ग्रह, तारे, चंद्र आदी एकमेकांजवळ आल्यासारखे दिसतात. त्याला ‘युती’ असे म्हटले जाते. प्रत्यक्षात हे घटक एकमेकांच्या जवळ असतीलच, असे नाही. मंगळ-शनी युतीमध्येही दोन्ही ग्रह एकमेकांना जवळ दिसत असले, तरी प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांपासून प्रचंड अंतरावर आहेत, असे खगाेल अभ्यासकांनी सांगितले.
५ एप्रिलच्या पहाटे साधारण ४:३० पासून सूर्योदयापर्यंत पूर्वेला ही युती उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. द्विनेत्री किंवा दुर्बीण असल्यास हे दृश्य अधिक चांगले दिसू शकेल. पहाटे लवकर उठून सुखद गारवा अनुभवत ही देखणी युती नक्की बघावी. - विनय जोशी, खगोल मंडळ, नाशिक.शनी व मंगळ हे मकर राशीतच आहेत. शनी हा २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, तर ७ एप्रिल रोजी मंगळ हा ग्रह कुंभ राशीत जाणार आहे. मंगळ हा शेवटच्या अंशावर आहे. या युतीमुळे गेल्या काही दिवसांत उष्णतामान वाढल्याचे दिसून येते. या कालावधीत काही स्फोटक घडण्याची शक्यता आहे. - मोहनराव दाते, दाते पंचांगकर्ते, सोलापूर.