नाशिक : एरवी नाशिककरांना गंगापुररोडवरील पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीवर दररोज भारताचा तिरंगा डौलाने फडकलेला नजरेस पडतो; मात्र शनिवारी (दि.२४) दिवसभर तिरंग्याशेजारी एक नवा निळ्या रंगाचाही ध्वज फडकविण्यात आल्याचे दिसले. यामुळे नाशिककरांमध्येही कुतुहल निर्माण झाले. काहींनी हा ध्वज ओळखला तर काहींना ओळखता आला नाही; मात्र हा ध्वज संयुक्त राष्ट्राचा होता आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार संयुक्त राष्ट्रदिनाच्या औचित्यावर ध्वज फडकविण्यात आला होता.
२४ऑक्टोबर १९४५ साली संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले संमेलन सॅनफ्रॅन्सिस्को येथे पार पडले होते. १९३ देश या संघाचे सदस्य आहेत. हवामान बदल, लोकशाही, निर्वासित व प्रवाशी, वैश्विक मुद्दे, वैश्विक आरोग्य संकट, आतंकवादाशी लढा हे प्रमुख मुद्दे संयुक्त राष्ट्र संघाचे आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा अधिक सुलभ व्हावा, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार आणि विश्व शांतीसाठी संयुक्त राष्ट्र प्रयत्नशील आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर या संघाची स्थापना करण्यात आली. न्युयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय आहे. संघाच्याअधिकारिक भाषांमध्ये हिंदी भाषेला स्थान दिले जावे, यासाठी भारताकडून मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. कारण संपुर्ण विश्वात सर्वाधिक बोलली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची भाषा हिंदी असल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे.
भारतात संयुक्त राष्ट्राच्या एकुण २६ संघटना सेवा देत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारकडून संयुक्त राष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस आयुक्तालयाला पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार आयुक्तालयाच्या इमारतीवर भारतीय राष्ट्रध्वजाशेजारी दुसऱ्या ध्वजस्तंभावर संयुक्त राष्ट्राचे ध्वज सुर्योदय होताच फडकविण्यात आला.