नाशिक : ‘गण गण गणात बोते’चा घोष, टाळमृदंगचा गजर, लेजीमच्या तालावर लयबद्ध नाचणारे पथक, पारंपरिक मराठी वेशभूषेतील महिला-पुरुषांचे जथ्थे, हवेत फडफडणारे भगवे ध्वज आणि राजदंड, छत्र-चामर, चवरी अशा लवाजम्यांसह दिमाखात निघालेली श्री गजानन महाराजांची पालखी असे मनोरमदृश्य अमेरिकेत पाहायला मिळणार आहे. सॅन फ्रान्सिस्को बे-एरिया, लॉस एंजेलिस आणि साउथ फ्लोरिडा या तीन ठिकाणी ५ मार्च रोजी हा सोहळा होणार आहे.संत श्री गजानन महाराज यांच्या १३८व्या प्रकट दिनानिमित्त ‘श्री गजानन महाराज अमेरिका परिवार’ या अमेरिकेतील नोंदणीकृत संस्थेतर्फे उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग-धंद्यानिमित्त अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या या भक्तगणांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून यासाठी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे.सॅन फ्रान्सिस्को बे-एरियात हा उत्सव ५ मार्च रोजी सनीवेल या उपनगरात आयोजित केला आहे. कार्यक्रमाची सुरुवात श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणाने होऊन त्यानंतरची भक्ती-संगीताची मैफल होणार आहे. पालखी मिरवणूक आणि पादुका दर्शन यानंतर महाप्रसादाने या सोहोळ्याची सांगता होणार आहे.लॉस एंजेलिसमध्येही हा उत्सव अर्वाइन या उपनगरात साजरा होणार आहे. या ठिकाणी प्रथम ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा नामगजर, त्यानंतर पालखी सोहळा आणि महाआरती अशी उत्सवाची रूपरेषा आहे. साउथ फ्लोरिडा येथे येत्या २७ फेब्रुवारीला ओकलंड पार्क या उपनगरात श्री गजानन महाराजांच्या नामजपाच्या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमेरिकेत ‘...गणात बोते’चा गजर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 11:18 PM