नाशिक : श्रमाचे महत्त्व आणि त्यातून शिक्षण हेच विद्यापीठाचे ब्रिद आहे़ त्यामुळे यापुढे मुक्त विद्यापीठात अभियांत्रिकी कौशल्याचे शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ माणिक साळुंखे यांनी येथे व्यक्त केले़मविप्रच्या अॅड़ ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या श्रमसेवा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते़ डॉ़ साळुंखे यांच्या हस्ते श्रमसेवा पुरस्काराने वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम करणाऱ्या पुणे येथील उषाताई वाघ यांना सन्मानित करण्यात आले़ २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते़डॉ़ साळुंखे म्हणाले, व्यवसाय, कष्टकऱ्यांसह सर्व स्तरातील विद्यार्थी विद्यापीठाशी जोडले गेल्याने त्यांना श्रमाची जाणीव आहे़ अनेकदा असे निदर्शनास येते की, ठरावीक अहवाल देणे म्हणजे शिक्षण. परंतु वास्तव खूप वेगळे आहे़ प्रगत देशांमध्ये शिक्षणाला कौशल्य व संशोधनाची जोड दिली जाते. तेच करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत़ यासाठी कम्युनिटी कॉलेजची संकल्पना आपल्याकडे राबवली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़पुरस्काराला उत्तर देताना वाघ म्हणाल्या, आजच्या आधुनिक काळात श्रम व सेवेची फारकत झाली आहे़ श्रमाशिवाय सेवा करण्याचा केविलवाणा प्रयत्न आजची पिढी करत आहे़ तशी संधीही उपलब्ध झालेली आहे; परंतु श्रमामार्फत केलेली सेवा ही अनमोल असते़ जीवनातील सर्वात मोठे समाधान यामध्ये आहे, असे वाघ म्हणाल्या. या पुरस्काराने अधिक श्रम करण्याचे बळ मिळाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली़ पुरस्कार समारंभानंतर विद्यापीठाच्या नाशिक विभागातील अभ्यास केंद्रांच्या केंद्रप्रमुखांची आणि केंद्र संयोजकांची सहविचार सभा कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झाली़ यामध्ये नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील केंद्र संयोजक उपस्थित होते़ याप्रसंगी मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ़ सुरेश पाटील, अॅड़ ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत पट्टीवार, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोंडगे, कुसुमाग्रज अध्यासनाचे श्याम पाडेकर आदि उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा कुलकर्णी यांनी केले़ (प्रतिनिधी)
विद्यापीठात अभियांत्रिकी कौशल्यावर भर
By admin | Published: November 02, 2014 11:42 PM