नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठविद्यार्थी परिषदेचे गठन करण्यात आले असून, विद्यापीठविद्यार्थी परिषद प्रतिनिधींची सर्व जागांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. विद्यापीठ अधिसभेसाठी तीन विद्यार्थी प्रतिनिधी तर विद्यार्थी परिषदेकरिता एक अध्यक्ष, एक सरचिटणीस, दोन उपाध्यक्ष व दोन संयुक्त सचिव या कार्यकारी प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८ मधील तरतुदीनुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यार्थी परिषदेतून तीन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बीडचे सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा पद्मसिंह जामकर, अमरावती विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या दंत महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिनंदन बोकरिया, शिरपूर केव्हीटीआर आयुर्वेद महाविद्यालयाचा निखिल चौधरी या तीन विद्यार्थी प्रतिनिधींची विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी मुंबईचे आर.ए. पोतदार वैद्यकीय महाविद्यालयाचा शिवराज काळे याची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदासाठी कोल्हापूरचे कै.केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालयाचा विद्यार्थी पवनकुमार भोईर, नाशिकच्या श्रीमती के.बी. आव्हाड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी तृप्ती जोशी यांची तर सरचिटणीसपदी कोल्हापूर पीएसएम प्रकाश इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च महाविद्यालयाचा सौरव मुळे यांची व संयुक्त सचिवपदी अहमदनगर येथील एसएमबीटी दंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा सूर्यवंशी, मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेत निवड झालेल्या सर्वांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. या निवडप्रक्रियेसाठी डॉ. संदीप गुंडरे, संदीप कुलकर्णी, राजेंद्र नाकवे, डॉ. स्वप्नील तोरणे, किशोर पाटील, जी.एन. सूर्यवंशी, स्मिता करवल, श्रीमती रंजना देशमुख यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाचे सर्व संलग्नित महाविद्यालयातील अधिष्ठाता व प्राचार्य यांनी आपापल्या महाविद्यालयातील विद्यार्थी सचिव व प्रतिनिधींची नावे विद्यपीठास कळविली होती. यामधील पात्र विद्यार्थी मतदारांतून विद्यापीठ अधिसभेकरिता विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यापीठ विद्यार्थी परिषद सदस्यांची निवड करण्यात आली आहे.विद्यापीठ विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत असल्याने विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थी परिषद सदस्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यांच्या शंका, तक्रारींचे निरसन करून विद्यार्थी आणि विद्यापीठाचा दुवा होण्याचे काम करावे.- डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव
आरोग्य विज्ञान विद्यापीठ : विद्यार्थी प्रतिनिधी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:20 PM