खंबाळे : परिसरातील गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असून, आठवडाभरात आठ गायी दगावल्याने पशुपालक धास्तावले आहे. दुष्काळात पशुधन सांभाळणे अवघड असताना अज्ञात रोगाची लागण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सिन्नर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने परिसरात जनावरांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. बोटुलिझम हा जनावरांचा पॅरेलिसिससदृश आजार असावा, असे प्राथमिक निदान करण्यात आले आहे. आजारी जनावरांचे नमुने पडताळणीसाठी घेण्यात आले असून, पुण्याच्या प्रयोगशाळेत ते पाठविण्यात आले आहेत. जनावरांना अपचनाचा त्रास होणे, चारा कमी खाणे, विष्ठा व लघवी करण्यास त्रास होणे अशी प्राथमिक लक्षणे या आजारात दिसून येतात. हा आपल्या परिसरात दुर्मीळ आजार असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी सांगितले. दापूर परिसरातदेखील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, पशुसंवर्धन विभागाने या भागात तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आजारी जनावरांबाबत तातडीने पंचायत समितीला सूचित करावे, दगावलेल्या जनावरांची परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहन डॉ. भणगे यांनी केले आहे.
अज्ञात रोगाने खंबाळे परिसरात आठवड्यात आठ गायी दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:22 PM