नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर रायगड नगर शिवारात गुरुवारी (दि.२५) रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास एका नाट्य कलाकारावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार करत पोबारा केला. सुदैवाने नेम चुकल्याने वाहन चालक थोडक्यात बचावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासाची चक्रे फिरविली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील स्वप्निल नंदकिशोर दंडगव्हाळ (वय ३४) रा.कॉलेज रोड, नाशिक हे काही कामनिमित्त ठाणे येथे आपल्या मित्राचे वाहन (क्रमांक एम एच १५ इपी १४३४) घेऊन गेले होते. रात्री नाशिककडे परतत असताना, महामार्गावरिल हॉटेल करिश्मा येथे ते जेवणासाठी थांबले. जेवण करून पुन्हा वाहनाने रायगड नगर जवळ यूटर्न घेण्यासाठी जात असताना, वालदेवी नदी पुलावर नाशिक बाजूकडून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने पिस्टलमधून चालकाच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, स्टेयरिंगसमोरील डॅश बोर्डला चाटून गोळीने दिशा बदलली व ती पाठीमागील टपमध्ये जाऊन अडकली. सुदैवाने यात बचावलेल्या दंडगव्हाळ यांनी तत्काळ वाडीवऱ्हे पोलिसांशी संपर्क साधला व घडलेला वृतांत सांगितला. पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
इन्फो
तीन पथके कार्यान्वित
स्वप्निल दंडगव्हाळ हे नाट्य कलावंत असून, कोरोनाच्या काळात नाटक बंद असल्याने जमीन खरेदी-विक्रीचाही व्यवसाय करत असल्याचे त्यांनी सांगितले. हल्ला नक्की कोणी व का केला, याबाबत पोलिस शोध घेत असून, वाडीवऱ्हे येथील दोन पथके आणि गुन्हे शाखेचे एक पथक याबाबत सखोल चौकशी करीत आहेत. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत भादंवी कलम ३०७, ३४ सह आर्मॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा तपास पोउप.निरीक्षक नितिन पाटील हे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक अर्जुन भोसले यांनी भेट देऊन पोलिसांना तपास कामी सूचना दिल्या.
फोटो- २६ वाडिवऱ्हे फायर-१
गोळीबारामुळे कारच्या काचेला पडलेले छिद्र.