नाशिक : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील मोसम नदीवर कोल्हापूर टाइप बंधारा बांधण्यास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिलेली असताना, आणि त्यातही उपसचिवांनी जलसंपदा विभागास ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे सुचविले असताना भाजपाच्या महिला सदस्यांवर जिल्हा परिषद व जलसंपदा कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.बागलाण तालुक्यातून भाजपाकडून निवडून आलेल्या सदस्य सुनीता चिंतामण पाटील यांनी नामपूर व लगतच्या गावांतील टॅँकरमुक्तीसाठी मोसम नदीवर लघुपाटबंधारे विभागामार्फत सुमारे ८० लाखांचा बंधारा मंजूर करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पावसाळा लांबल्याने जूनपर्यंत नामपूर व लगतच्या गावांमध्ये पाण्याच्या टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ नामपूर व लगतच्या गावांमध्ये आली होती. हरणबारी धरणातून दिवसाला १० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन साधारणत: शासनाचे त्यावर ७० हजार रुपये खर्च होत असल्याकडे सुनीता पाटील यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. नामपूर येथे मोसम नदीवर को. टा. बंधारा बांधल्यास नामपूर व लगतच्या गावांची पाणीटंचाई कायमस्वरूपी मुक्त होण्याची शक्यता असल्याने येथे को. टा. बंधारा बांधण्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाला त्याबाबतचे आदेश दिले होते; मात्र बंधारा मोसम नदीवर असल्याने त्यासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय निधी वितरीत करण्यात येणार नाही, अशी मेख विभागाने मारली. त्याचाही सुनीता पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले. जलसंपदा विभागाचे उपसचिव सं.अ. टाट यांनी ३ जून २०१६ रोजीच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राजपूत यांना काही अटी-शर्तींच्या आधारे नामपूर येथे को. टा. बंधारा बांंधण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या सूचना केल्या; मात्र पालकमंत्री आणि उपसचिव यांच्या सकारात्मक भूमिकेला विभागाकडूनच ‘खो’ घातल्या गेल्याचे चित्र आहे. हे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणि या बंधाऱ्याचे काम सुरू होण्यासाठी भाजपा महिला सदस्यालाच जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे व जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
By admin | Published: July 21, 2016 12:49 AM