भाजप, स्वयंसेवक संघासारखी काँग्रेसमध्ये हुकूमशाही नाही - एच. के. पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 09:53 AM2022-06-03T09:53:45+5:302022-06-03T09:55:01+5:30
प्रदेश काँग्रेसच्या नवसंकल्प कार्यशाळेची सांगता
शिर्डी : काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष असल्याने या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोकळेपणाने व स्पष्टपणे आपली मते मांडली. ती मते विचारात घेण्यात आली. अशा पद्धतीची लोकशाही भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे का, असा सवाल महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेची सांगता गुरुवारी सायंकाळी झाली. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
एक व्यक्ती एक पद नियमानुसार या शिबिरात ५१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. सरकार व पक्ष संघटना यांच्यात समन्वय साधणे, संघटन वाढवणे यावरही विस्तृत चर्चा झाली आहे. थोरात म्हणाले, शिर्डी कार्यशाळेतील दोन दिवसांच्या मंथनातून जे सार निघाले आहे.
अष्टसूत्रीवर भर-
ज्वलंत मुद्द्यांवरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजप जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करत आहे. यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य, महागाई, सामाजिक सुरक्षा ही ‘अष्टसूत्री’ काँग्रेस पक्षाच्या प्राधान्यावर असेल. या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष आक्रमकपणे आवाज उठवेल, असा ठराव अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राजकीय समितीने घेतला.