नाशिक : लॉकडाऊन शिथिल करून अनलॉकची घोषणा केल्यानंतर जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे; मात्र तरीदेखील शहराच्या वेशीवर शहर वाहतूक पोलिसांकडून वाहने रोखली जात असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहेत. यामुळे पोलिसांच्या कारवाईविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मुंबई-आग्रा, नाशिक पुणे महामार्गावरून शहरात येणाऱ्या नागरिकांना शहराच्या वेशीवर रोखले जात आहे. प्रवास करण्यासंदर्भात पोलिसांची पुर्व परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न विचारत शहर पोलीसांच्या पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यावरील निर्बंध जर हटविले गेले असतील तर मग पोलिसांकडून कारवाईचा ससेमीरा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच पोलिसांची शहराच्या वेशीवर सुरू असलेली कारवाई यामुळे संशयाच्या भोवºयात सापडली आहे.शासनस्तरावरून जिल्हांतर्गत प्रवास हा अधिकाधिक मोकळा करण्यासंदर्भात सुचना आलेल्या असताना दुसरीकडे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करताच नाकाबंदी पॉइंटवर वाहनांची अडवणूक करून पुर्व परवानगीचा पास काढला आहे का? याबाबत विचारणा केली जात आहे. पास नसल्यास संबंधितांकडून दंड आकारला जात आहे. नागरिकांमध्ये एकूणच शासकिय यंत्रणेच्या असमन्वयामुळे गोंधळ निर्माण होत आहे. जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी जर प्रवास करायचा असेल तर त्यास मोकळीक द्यावी, असे शासनाचे निर्देश आहे; मात्र जिल्ह्यात प्रवासाबाबतसुध्दा आता पोलिसांकडून निर्बंध आणले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हांतर्गत प्रवासावर कुठलेही निर्बंध नसून त्यासाठी पुर्व परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढणे बंधनकारक नाही. तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग शासनाच्या आदेशानुसार मोकळा करण्यात आला आहे. एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाण्यासाठी अथवा जिल्हांतर्गत कन्टेंन्मेंट झोनमध्ये प्रवास करण्याकरिता परवानगीची गरज भासते.-नीलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी, नाशिकएका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करावयाचा असल्यास तसेच जिल्हांतर्गतदेखील प्रवास करावयाचा असेल तर त्यासाठी शहरी भागातील नागरिकांना पोलीस आयुक्तालयाच्या कोरोना सेलमधून पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधितांवर नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांकडून कारवाईदेखील होऊ शकते.-नारायण न्याहाळदे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, कोरोना कक्ष