नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेल्या दुचाकीचा अवघ्या २४ तासांत शोध घेतला असून, याप्रकरणी एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरहरीनगरमधील सप्तशृंगी प्रसाद अपार्टमेंटमधील रहिवासी महेंद्र कोरी यांनी आपली जांभळ्या रंगाची पल्सर दुचाकी (एमएच १५, बीएफ ९५३४) बुधवारी (दि़५) रात्री अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली होती़ दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि़६) सकाळी बाहेर जाण्यासाठी ते पार्किंगमध्ये गेले असता दुचाकी जागेवर नव्हती़ त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला मात्र न सापडल्याने त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली होती़
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस निरीक्षक आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी दुचाकीचोरीचा तपास सुरू केला़ शुक्रवारी (दि़७) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे राजेश निकम, रियाज शेख व राजेंद्र राऊत हे स्वराजनगरमध्ये गस्त घालीत असताना त्यांना एका दुचाकीवरून जाणारा मुलगा संशयास्पद वाटला़ त्यांनी त्यास हटकले असता पळ काढल्याने त्याचा पाठलाग करून वडनेर गेट रस्त्यावरील पाथर्डी गावाच्या पुढे ताब्यात घेऊन चौकशी केली असता पल्सर चोरीची कबुली केली़
दरम्यान, या विधीसंघर्षित मुलाकडून चोरीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली आहे़