सारांशनशीब बलवत्तर म्हणायचे, त्यामुळे नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपला राखता आली. यात निष्ठावंताला महापौरपदाची उमेदवारी दिली गेल्याने समीकरणे बदलली हे जितके खरे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक हेही खरे की, काही वर्षांपूर्वीच्या सहयोग धर्माची जाण ठेवत ‘मनसे’ने भाजपची पाठराखण केल्यानेच आघाडीकर्त्यांचे इरादे भंगले आणि त्यातूनच सत्ताधाऱ्यांचा ‘पुन्हा’ सत्तेत येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. तसे झाले नसते व निवडणूक घेण्याची वेळ आली असती, तर भाजपसह शिवसेना व काँग्रेसमधील बंडखोरीचे वेगळेच चित्र समोर आलेले पहावयास मिळाले असते.नाशिकच्या महापौरपदी सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड होऊन पालिकेतील सत्ता भाजपनेच राखली असली तरी, ते सहज घडलेले नाही. वास्तविक पूर्ण वा स्पष्ट बहुमतात असलेल्या भाजपला त्यासाठी धसका घेण्याची गरजच नव्हती; पण राज्यातील तोवरची सत्तासमीकरणे पाहता नाशकातही महाशिव आघाडी साकारण्याची चिन्हे लक्षात घेऊन बहुमतातील नगरसेवकांना पर्यटन घडविले गेले. बहुमताच्या अनुषंगाने राजकारणात जी मग्रुरी व बेफिकिरी येते ती भाजपच्या ठायीही होती. म्हणूनच पक्षाला काडीचा लाभ करून न देता स्वत:लाच लाभान्वित करून घेणाऱ्यांची नावे प्रारंभी महापौरपदासाठी चर्चिली जात होती. पण परपक्षीयांना डोक्यावर बसविल्याने कशी वाताहत होते, हे गेल्या विधानसभा निवडणुकीतच अनुभवल्याने पक्षाचे ‘पालक’ गिरीश महाजन यांनी समजूतदारीचा निर्णय घेत जुन्या जाणत्या निष्ठावंतास उमेदवारी दिली आणि त्यामुळेच स्वपक्षातील अढी सुटण्यास मदत झाली. अन्यथा, बाहेरून आलेले व यापूर्वी कोणती ना कोणती पदे भूषविलेल्यांनाच संधी दिली तर मतदानासच न येण्याची धमकी स्वकीयांकडून देण्यात आली होती. तेव्हा, सतीश कुलकर्णी यांची उमेदवारी ही या अशा नाइलाजाच्या पार्श्वभूमीतून आलेली होती हे येथे लक्षात घ्यायला हवे.महत्त्वाचे म्हणजे, गेल्या पंचवार्षिक काळात राज्यात प्रथमच महापालिकेतील सत्तेची संधी मिळवताना नाशकात मनसेला भाजपचेच सहकार्य लाभले होते. तेव्हा ‘मनसे’चा महापौर होताना याच सतीश कुलकर्णी यांना उपमहापौरपदाची संधी लाभली होती. त्यामुळे तेव्हाच्या त्या सहयोग धर्माची परतफेड यंदा मनसेने करून राजकारणात काहीही अशक्य नसते, हेच स्पष्ट करून दिले आहे. विशेषत: गेल्या लोकसभा व विधानसभेच्याही निवडणुकांत ज्या पद्धतीने राज ठाकरे भाजपवर तुटून पडल्यागत प्रचार करताना दिसले होते, ते बघता एका महापालिकेसाठी व तेही भाजपच्या सत्तेकरिता ‘मनसे’ त्यांच्या वळचणीला जाण्याची कल्पनाच करता येणारी नव्हती. पण येथे नवीनच ‘नाशिक पॅटर्न’ आकारास आला, त्यामुळेही महाशिव आघाडी साकारण्यापूर्वीच संबंधितांचे अवसान गळाले.दुसरे म्हणजे, पक्षापेक्षा स्वत:चे स्तोम माजवून उभयतांचे नुकसान करवून घेण्याची काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची अतिमहत्त्वाकांक्षाही आड आली. शिवसेनेकडून सारी व्यूहरचना केली जात असताना उपमहापौरपदाचा आग्रह धरला गेला म्हणे. त्यामुळेही आघाडीत प्रारंभापासूनच बिघाडीची बिजे पेरली गेली. तिकडे शिवसेनेतही बाळासाहेब सानपच ईरेला पेटल्यासारखे कार्यरत दिसले; पण ती एकांगी धडपड होती. परिणामी तिकडेही कुणाच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. विरोधकांच्या आघाडीवरील या निर्नायकत्वाचाच लाभ भाजपने उचलला.अर्थात, एक बरे झाले, निष्ठावंत सतीश कुलकर्णींना महापौरपदासाठी पुढे केले गेल्याने भाजपतील बंडखोरांच्या परतीचा मार्ग खुला झाला. त्यांच्या ऐवजी दुसºयास संधी दिली गेली असती तर ऐनवेळी भाजपतील अन्यही नगरसेवकांनी वेगळा पवित्रा घेतल्याचे दिसून आले असते. कुलकर्णी यांना उमेदवारी घोषित केल्यामुळेच सानपांनाही शस्रे टाकावी लागली; अन्यथा भाजपतील फूट अटळ होती. शिवाय शिवसेनेने कुणीही उमेदवार दिला असता, तरी परस्परांतील मतभेदांमुळे त्यांच्यातील व सोबत काँग्रेसमधीलही फाटाफूट टळली नसती. कॉँग्रेस नगरसेवक तर अगोदरपासूनच भाजपच्या संपर्कात होते असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहेच. तेव्हा, निवडणूक टळल्याने सारेच निभावले. बिनविरोध निवडीमुळे या सर्वांच्याच स्वबळाची व पक्षनिष्ठेची मूठ झाकलेलीच राहिली.
बिनविरोध निवडीमुळे सर्वच पक्षीयांची मूठ राहिली झाकलेली!
By किरण अग्रवाल | Published: November 24, 2019 1:31 AM
नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपकडेच राहण्यात ‘मनसे’ची भूमिका निर्णायक ठरलीच, शिवाय शिवसेना व काँग्रेसमध्ये सांधा जुळू न शकल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे स्वकर्माऐवजी प्राप्त परिस्थितीनेच भाजपच्या पदरी यश पडल्याचे म्हणता यावे. यात निष्ठावंतास संधी लाभली हीच जमेची बाब.
ठळक मुद्दे ‘मनसे’ने भाजपची पाठराखण केल्यानेच आघाडीकर्त्यांचे इरादे भंगले जुन्या जाणत्या निष्ठावंतास उमेदवारी येथे नवीनच ‘नाशिक पॅटर्न’ आकारास आला