नाशिक/छत्रपती संभाजीनगर : राज्यात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू आणले. अनेक पिके भुईसपाट झाली आहे. धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यात गारपीट झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव व कन्नड तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले.
नाशिक : जिल्ह्यातील १३५ गावांमध्ये सुमारे २ हजार ४३३ शेतकऱ्यांचे उभ्या पिकांवर पाणी फिरल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला.
नंदुरबार : रब्बीचा गहू, हरभरा या पिकांसह कांदा, पपई व केळीचे शेकडो हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले.
धुळे : साक्री तालुक्यात माळ माथ्यावर टिटाणे परिसरात सोमवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.