पाटोदा - लोकसभा निवडणुकीत शेतकरीविरोधी सरकार म्हणून आरोप करत केंद्रातील मोदी सरकार जोपर्यंत पायउतार होत नाही तोपर्यंत अंगात शर्ट-बनियन न घालता अर्धनग्न आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे नगरसूल, ता. येवला येथील शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत अपेक्षाभंग झालेल्या डोंगरे यांनी सावध पवित्रा घेत विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवसापर्यंत आंदोलनाचा कालावधी वाढविला आहे. गेल्या दोन वर्षापासून नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने विविध अनोखे आंदोलने करत भाजपा सरकारची डोकेदुखी वाढविली आहे. तालुक्यातील पूर्वोत्तर दुष्काळी असलेल्या नगरसूल गावात कृष्णा आपल्या कुटुंबासह शेती करतो. सन 2017 मध्ये कांद्याला 100 ते 125 रुपये भाव मिळाला म्हणून डोंगरे यांनी पाच एकर पिकाला अग्निडाग देत सरकारचा प्रतीकात्मक निषेध केला होता.
त्यानंतर येवला तालुका दुष्काळी जाहीर करावा यासाठी 24 ऑक्टोबर 2018 रोजी मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहित मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस हे सरकार चालविताना उत्कृष्ट अभिनय करत असल्याचा आरोप करत त्यांना अल्बम काढण्यासाठी 500 रुपयांचे निधी देण्याचे त्यांनी जाहीर केल्याने येवल्यातील मुख्यमंत्र्यांच्या सभेअगोदर त्यांना पोलिसांनी स्थानबद्धही केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरे यांनी केंद्रातील पार्श्वभूमीवर डोंगरे यांनी केंद्रातील मोदी सरकार जोपर्यंत पायउतार होत नाही तोवर अंगात शर्ट व बनियन न घालता अर्धनग्न आंदोलन पुकारले होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळगाव बसवंतला झालेल्या सभेपूर्वीही डोंगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तर शरद पवार यांच्या सभेत त्यांनी अर्धनग्न अवस्थेतच व्यासपीठावर जात निवेदन दिले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तारुढ झाल्यानंतर डोंगरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक निकालाने अपेक्षाभंग झालेल्या डोंगरे यांनी आता सावध भूमिका घेत राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
शासनाने शेतकऱ्यांना फसविल्यामुळेच शासनाविरुद्ध मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मला हे आंदोलन करावे लागत आहे. लोकसभा निवडणूक झाली मात्र आता विधानसभेच्या मतदानापर्यंत माझे आंदोलन सुरुच राहील. आता तरी सरकारला जाग यावी - कृष्णा डोंगरे, शेतकरी