नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला असून जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतीक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. सर्वाधिक नुकसान निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगाव तालुक्यांमध्ये झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तीनदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांचा धोका वाढलेला असताना गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानीत अधिकच भर पडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८६ गावांतील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले. पशुधनाचेदेखील मोठे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण करण्यात आले. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
बदलत्या ऋतुचक्रानुसार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील ८६ गावांमधील शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळीमुळे गहू, मका, बाजरी, ज्वारी, हरभरा व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांनाही तडाखा बसला आहे. पपई, आंबा, डाळिंब व द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश आहे.
--इन्फो--
वीज पडून जीवितहानी
जिल्ह्यात निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. पशुधनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगावमध्ये बैल, सिन्नरमध्ये गाय तर देवळ्यात शेळी मृत्युमुखी पडली. अनेक ठिकाणी गोठ्यांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर घरपडझडीच्याही घटना घडल्या आहेत.