कळवण तालुक्यात नुकसान
कळवण : शहर व तालुक्याच्या विविध भागात बुधवारी सायंकाळी ५ वाजेपासून विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने दणका दिला. तालुक्यातील विविध गावांना वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने मिरची, टोमॅटो, कोथिंबीर या भाजीपाल्यासह आंबे या फळ पिकाचेही मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला असून बहुसंख्य शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
काजीसांगवीला गारपीट
काजीसांगवी - चांदवड तालुक्यातल्या काही भागामध्ये सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्याचबरोबर तुरळक गारपीटही झाली. सध्या ग्रामीण भागामध्ये शेतीच्या नांगरणीचे काम सुरू आहे. मात्र कांद्याचे बियाणे काढण्यासाठी जे पीक (डोंगळे) आहे, ते मात्र या पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. दिघवद, दहिवद, पाटे सोनेसांगवी, काजीसांगवी या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.